वारी आणि चंद्रभागा

वारी आली की स्मरणरंजनाच्या भावना जागतात. आईची आई स्वतः अभंग रचायची. प्रा. र. बा. मंचरकरांनी तिचे अभंग संपादित केले होते. वडिलांची आई देखील नियमित वारीला जाई. वारीच्या आठवणींशी या दोन्ही आज्यांनी दिलेले प्रेम, भोगलेली दु:खे, त्यांची बघितलेली मरणे निगडित आहेत. वारीला त्या आठवणी घट्ट चिकटलेल्या आहेत. भजनांचे अस्वस्थ करणारे गजर, आज्यांचे चेहरे, त्यांचे शेवटचे दिवस, आजारपणे, अंत्ययात्रा, नंतरची पोकळी आणि खूप काही.
देव कुठला चमत्कार करीत नाही. त्यानेच जग निर्मिले असेल तर त्या जगातले पदार्थ विज्ञानाचे किंवा कोणत्याही शास्त्राचे नियम तो का म्हणून मोडील? देवावर भार टाकणाऱया आणि कुठल्याच दु:खाबद्दल तक्रार न करणाऱया आज्यांचे जगणे आठवताना हे सगळे अबोधपणी त्यांच्याकडे बघून मनात रुजले. तो वेगळाच विषय. पण वारीच्या निमित्ताने वेगळे लिहायचे आहे.
आमच्या शहराच्या पेठांमध्ये अनेक कुटुंबात घरगुती पातळीवर वारीचे उराउरी उत्कट स्वागत होते. अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे वारकऱयांना आवर्जून घरी बोलावतात. परवा आमच्या शेजारच्या वाडय़ात भोजनाला गेलो होतो. त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून ही प्रथा आहे. घरातली सगळी लहानमोठी माणसे स्वयपाकासाठी राबतात. भोजनाला येणाऱया दिंडय़ा निश्चित, नियमित आहेत. परिचित झाल्या आहेत. त्यातले काहीजण नांदेड-परभणीहून येतात. त्यांचा संपर्क देखील असतो.
वारीच्या वाटेवरच्या शहरांमधली अशी अनेक घरे खेडय़ातल्या घरांशी जोडली गेलेली असतील. धार्मिक श्रद्धेपायी का असेना, सहभोजनाच्या निमित्ताने नातेसंबंध किंवा हितसंबंध नसलेली माणसे माणसांशी जोडली जाणे हे फार चांगले, समाजाला घट्ट बांधून ठेवणारे आहे. रोजच्या जगण्यात बुद्धिवादी नास्तिक भूमिका जपून देखील असे माणसांनी एकमेकांना धरून ठेवायला हरकत नाही. सगळय़ाच जातीधर्मातल्या लोकांना बांधून ठेवणारी अशी एखादी वारी अवतरली तर किती बरे होईल. 
मी कधी वारीला गेलो नाही. वारी नसताना पंढरपूरला गेलो आहे. तीन-चार खोल्यांचे छोटे घर आणि त्यात राहणाऱया छोटय़ा कुटुंबात एकदम पंचवीसतीस पाहुणे आले तर त्या कुटुंबाचे हाल होतील तसे वारीच्या वेळी पंढरपूरचे आणि चंद्रभागेचे हाल होतात अशी भावना झाली आहे. जायचेच झाले तर शक्मयतो वारी नसताना जावे. देवाला घरातल्या देव्हाऱयात देखील शोधता येईल असे वाटते

Comments

Popular posts from this blog

" स्वच्छतेचे महत्व "

प्लास्टिक नावाचा भस्मासुर

पाण्याचे महत्त्व जाणा