ओढाताण
मराठी भाषेतील काही शब्द.... नुसते शब्द नाहीत तर भावगुरु आहेत ते. त्यातलाच एक शब्द आहे....ओढाताण. व्याकरणीक विश्लेषण न करता त्यातील भावार्थ फारच उद्बोधक कसा आहे त्याचा शोध आपण घेऊया.
आयुष्यात ज्याने संघर्ष केला... त्याची ओढाताण काही कमी झाली नाही. ओढ आणि त्यातून निर्माण झालेला ताण काही घडवतो तरी वा काहीतरी बिघडवतो तरी.मुळात ओढ ही मनाच्या खणपटीला कायम बसून असते. कोणाला वाचनाची ओढ.. कोणास कामाची ओढ.. कोणास झोपेची.. कोणास आळसाची तर कोणास माणसांची ओढ असते. ओढीशिवाय जीवन नाही. ओढीशिवाय जीवनात रंगत नाही. ओढीची संगत असेल तर त्याचा ध्यास होतो. ध्यासाचं ध्येय होतं. ध्येयाचं उद्दिष्ट होतं. उद्दिष्ट साध्य करताना ताण येतो. सुकर ताण साध्यासाठी प्रेरक ठरतो. अतिरिक्त ताण काम नासवतो. ध्येय नासवतो. नाती नासवतो. विचार नासवतो. कधी कधी जीवन नासवतो. ओढ जशी हवीहवीशी वाटते त्याबरोबर येणारा ताणही हवासा वाटावा. त्यामुळे ताण खूप ताणला जात नाही.... आणि मग हलकेपणा येतो. अतिरिक्त ताण हा माणसांनी माणसांसाठी केलेली वाईट योजना आहे. समजूतदारपणा ज्यांच्यात आहे ते ताण देऊन ताणही तुटेल, असं कधी वागत नाही. जोडाजोडी आणि तडजोडी ज्या नात्यात असतील ती नाती कधी कुचकामी ठरत नाहीत.
युज अँड थ्रो च्या जमान्यात माणुसकी गहाण पडत चालली असताना प्रत्येकाची संपन्न जीवनासाठी जी ओढाताण होतेय ही फार शीणकारक आहे. सेवानिवृत्ततीनंतर काही अजिबात कामाच्या ठिकाणी सहज म्हणूनही कधी फिरकत नाही. जिथे... ज्या सहकाऱ्यांसोबत आयुष्याचा बराच काळ घालवला तिकडे पाय वळत नाही कारण... त्या काळात स्वजनांनी दिलेले ताण अधून मधून जागे होतातच.
तर काहींना दुसऱ्याची डुचमळ सावली पाहून इतक्या काही गुदगुल्या होतात की त्यासाठीही ते स्वतःची ओढाताण करुन घेतात.
आज समस्थांचं जीवनमान उंचावलेले जरी असले तरी.... शब्द न पाळणं.. दिला शब्द विसरुन जाणं... साधा मिसकाॅल पाहून का केला असेल म्हणून कधी विचारपूसही न करणं.. ही वृत्ती समाजभर पसरली आहे. ओढ कमी होऊन ताणाच्या तारा तानल्या जात असताना आपण वीणेची तार छेडावी. ओढ निर्माण करावी. एकमेकांना सूरताल द्यावा. ओढीने ओढीकडं जावं. गोडीगुलाबीचं गाणं गावं. मनाची ओढाताण सिमीत करावी.
आपण करुया सुरुवात. येतील माणसं ओढीनं. अतिरिक्त ताण एकमेकांचा कमी करण्यासाठी.
Comments
Post a Comment