आई, आमचे आत्मबळ!

आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातातील नोकरी सोडून दिली. राजीनामा द्यायला जात असताना टॅक्सीत एक गाणे सुरू होते- ‘तेरा साथ है तो, मुझे क्या कमी है, अंधेरे मे भी मिल रही रोशनी है...’ मी त्या टॅक्सी
ड्रायव्हरला हे गाणे वारंवार लावायला सांगत होतो. यावेळी डोळ्यांपुढे फक्त आई होती. आई, आम्हा
बहीणभावाचे आत्मबळ...

ऐन उमेदीच्या काळात एकामागोमाग एक संकटे येत गेली की भलीभली माणसे खचतात. मी नेमका अशा विपरीत परिस्थितीत सापडलो. नव्हे आमचे सारे कुटुंब सापडले. या अडचणीच्या-संकटांच्या काळात आई कणखरपणे आणि हिमतीने उभी राहिली. तिने आम्हाला भावाबहिणींना केवळ सांभाळले नाही, तर आमच्यात आत्मविश्वास पेरला. मला आत्मबळ दिले. तिच्या या आत्मबळाच्या भरवशावर पुढे यश संपादन करता आले. माझे, माझ्या बहिणींचे यश हे वडिलांची इच्छा आणि आईचे स्वप्न होते. ते पूर्ण होण्यामागे आई हेच निमित्त ठरली. आई हीच प्रेरणा ठरली.
मी एमएस्सीला असताना वडील नीळकंठराव यांचे आकस्मिक अपघाती निधन झाले. आमच्या कुटुंबावर संकट कोसळले. आई प्रभावती हिने स्वत:ला सांभाळले. आपण खचून चालणार नाही. माझी हिंमत हीच मुलांची हिंमत बांधेल याची पुरती जाणीव तिला झाली होती. ग्रामसेविका, शिक्षिका म्हणून अनुभव असलेली आई कमालीची स्वावलंबी. वडिलांच्या निधनानंतर आर्थिक परिस्थिती बिकट झाली. तिने पै न् पैचे चोख नियोजन करीत; बचत करीत आमच्या शिक्षणाची सोय केली. अमूक-तमूकच शिक, असा आग्रह मात्र कधीही धरला नाही. विश्वास टाकला. मोठी बहीण विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेत असताना नापास झाली. आईने तिला धीर दिला. बहिणीने कलाशाखेत प्रवेश घेतला. मन लावून अभ्यास केला. ती या शाखेतून विदर्भातून प्रथम आली. वडिलांच्या निधनानंतर आमचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी आईने दाखविलेला धीरोदात्तपणा आमच्यासाठी वटवृक्षाचा आधार ठरला. त्याचवेळी सामाजिक प्रवाहाविरोधात भूमिका घेत आमची पाठराखण केली. वडिलांचे आकस्मिक जाणे, मोठ्या बहिणीला सासरी होणारा त्रास अशा प्रसंगांतील आईच्या त्या खंबीर, स्वाभिमानी स्वभावाचे मला कौतुक वाटते. अभिमान वाटतो. वडिलांचे अचानक जाणे, एमएएससीत अवघ्या दीड टक्क्यांनी फर्स्ट क्लास जाणे, त्याचवेळी एमपीएससीत केवळ एक टक्का मार्क कमी पडल्याने पोस्ट न मिळणे, थोरल्या बहिणीच्या वाट्याला आलेल्या अडचणी, यामुळे खरेतर मी खचून जायचो. परंतु कदाचित आईच्या आणि वडिलांच्या संस्कारामुळे मी त्या प्रतिकूल परिस्थितीत ठाममध्ये आणि यशस्वीपणे उभा राहू शकलो.

मी अभ्यासात हुशार नव्हतो. लेखक होण्याचे स्वप्न होते. लिहू लागलो होतो. लेखक म्हणून नावारूपास येण्याचे स्वप्न पाहत असतानाच्या त्या दिवसांत एमपीएससी वा यूपीएससीतर्फे प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय समाविष्ट झाले. निधनाच्या काही दिवस आधी वडील मला म्हणाले होते, ‘कोणतीही नोकरी कर, कोणताही व्यवसाय कर, पण मोठा हो’. बाबांच्या त्या म्हणण्याचा अर्थ त्यावेळी लागला नाही. अत्यंत संघर्षातून शिक्षण घेत वयाच्या पंचेचाळिशीत बीए पदवीधर होण्याच्या त्यांच्या प्रवासाचा मी साक्षीदार होतो. मी त्यांना माझ्यातर्फे काय देऊ शकणार होतो! त्यांची इच्छा पूर्ण करणे माझ्या हाती होते. हाही मार्ग अर्थातच सोपा नव्हता.

वडिलांच्या निधनानंतरच्या दशक्रियेच्या दिवशी माझी एमपीएससीची पूर्वपरीक्षा होती. सारे विधिकर्म बाजूला ठेऊन परीक्षेला जाण्याचा मी निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाला नातेवाइकांकडून विरोध झाला. आई मात्र माझ्या पाठीशी उभी राहिली. तिने घेतलेल्या भूमिकेमुळे मी ती परीक्षा देऊ शकलो. विधिकर्म दुसऱ्या दिवशी पूर्ण केले. ते करताना मला आईचे शब्द सतत आठवत होते, ‘अतुलला वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे. त्याने ही इच्छा पूर्ण करावी हे माझे स्वप्न आहे.’ मी त्याचवेळी प्रतिज्ञा केली- वडिलांचे इच्छा पूर्ण करायची. आईचे स्वप्न पूर्ण करायचे! ही स्वप्नपूर्ती होईस्तोवर पायात जोडे घालणार नाही, केसांना कंगवा लावणार नाही आणि शर्ट इन करणार नाही, असा निर्धार मी केला. तेव्हाचा माझा हा निर्धार आज काहीसा बालीश वाटेल, पण एक निमित्त लागतं आपल्या ध्येयाची सतत आठवण करून देणारे. मी माझ्यापरीने तेव्हा या निर्धारातून हे निमित्त शोधले.

वडिलांच्या अपघात विम्याचे क्लेम सेटलमेंट करण्यासाठीची धावाधाव, पेन्शनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची लगबग आणि त्याचवेळी एमपीएससीची मुख्य परीक्षेची तयारी असे सारे एकाचवेळी आले. आईकडून मिळणारा धीर आणि विश्वास माझ्या पाठीशी नसता तर २२व्या वर्षी वर्ग-१ची ती नोकरी मी प्राप्त करू शकलो नसतो. या दिवसांत क्लासेस घेऊन, वृत्तपत्रांत लिखाण करून मिळणारे थोडेफार उत्पन्न हाती यायचे. मी आयएएस होण्यासाठीची तयारी सुरू केली. याहीवेळी अडचणींनी पाठ सोडली नाही. आयआरपीएस व आयपीएस ‘ग्रुप ए’च्या नोकरीसाठी दोनदा निवड झाली. मी जॉइन केले नाही. वडिलांचे स्वप्न म्हणून फक्त आणि फक्त ‘आयएएस’ हेच उद्दिष्ट बाळगले होते. दोन्ही बहिणींचा अभ्यास करवून घेत मला माझी तयारी करायची होती. या धावपळीत पुरेसा वेळ मिळायचा नाही. परिणामी थोड्या-थोड्या गुणांनी ‘ग्रुप ए’वर थांबत होतो. अशातच दोन्ही बहिणी एमपीएसीद्वारे अधिकारी झाल्या. आणि खऱ्या अर्थाने मला स्वत:च्या अभ्यासासाठी वेळ मिळाला. आयएएसची तयारी म्हणून मी माझ्या विभागप्रमुखांकडे दीर्घ रजेसाठी अर्ज दिला. त्यांनी तो नाकारला. कमी दिवसांची रजा घ्या, असे सांगितले. मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आज त्या निर्णयाबद्दल मला आश्चर्य वाटते, कसे मी हे धाडस केले होते. आणि जाणवते याही धाडसामागे आईची प्रेरणा होती.

आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातातील नोकरी सोडून दिली. राजीनामा द्यायला जात असताना टॅक्सीत एक गाणे सुरू होते- ‘तेरा साथ है तो, मुझे क्या कमी है, अंधेरे मे भी मिल रही रोशनी है...’ मी त्या टॅक्सी ड्रायव्हरला हे गाणे वारंवार लावायला सांगत होतो. यावेळी डोळ्यांपुढे फक्त आई होती. राजीनामा देण्याचे पाऊल उचलल्याने सारे आप्त हादरले असताना आईने माझ्या या निर्णयाला साथ दिली होती. ‘तुला जे योग्य वाटते तेच कर. माझे काहीच म्हणणे नाही’ हे तिचे शब्द मला बळ देते झाले. आईने संकटांशी केलेला सामना, घेतलेले परिश्रम लक्षात घेता त्याची उतराई केवळ तिचे छोटेसे स्वप्न पूर्ण करून होऊ शकत नाही. मी तिचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा मला आनंद मात्र आहे. आज दोन्ही बहिणी मोठ्या पदावर आहेत, यामागे तिचेच आशीर्वाद आहेत. तिचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन सतत मिळावे आणि जन्मोजन्मी अशीच; नव्हे हीच आई मिळावी हीच ईशचरणी प्रार्थना! 

Comments

Popular posts from this blog

" स्वच्छतेचे महत्व "

प्लास्टिक नावाचा भस्मासुर

पाण्याचे महत्त्व जाणा